आयकर विभागाचे मुख्यमंत्री गहलोत यांच्या निकटवर्तीयांवर छापे


नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीय उद्योगपतींवर आयकर विभागाच्या 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांची ही सर्व ठिकाणे असल्याचे सांगितले जात आहे.

आज (13 जुलै) सकाळी आयकर विभागाचे पथक अशोक गहलोत यांचे निकटवर्ती आणि ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर दाखल झाले. अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर त्यांनी छापे टाकले. विशेष म्हणजे स्थानीक पोलिसांनाही या छाप्यांची माहिती देण्यात आली नव्हती. केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत ही कारवाई आयकर विभागाच्या पथकाने केली.

आयकर विभागाने राजीव अरोरा यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र राठोड यांच्या देखील घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे धर्मेंद्र राठोड निकटवर्ती मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांची चौकशी केली जात आहे. यात त्यांनी केलेल्या परदेशातील व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

आयकर विभागाकडून राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या जवळपास 24 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या कारवाईतून भाजप राजस्थानमधील काँग्रेसचे गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

राजस्थान काँग्रेसचे राजीव अरोरा हे आर्थिक व्यवस्थापन करतात. त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्या विविध ठिकाणांवर केलेल्या छापेमारीचे अनेक अर्थ निघत आहेत. यावरुन राजकीय चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसही भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या आरोपांचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी खंडन केलं आहे. संबित पात्रा म्हणाले, कोरोनामुळे आयकर विभागाची छापे टाकण्याची कारवाई थांबलेली होती. आता पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात झाली आहे. या छापेमारीचा आणि राजस्थानमधील राजकीय संकटाचा काडीमात्र संबंध नाही.

Leave a Comment