एक शरद… सगळे गारद भाग 2; मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर काय म्हणाले शरद पवार ?


मुंबई – संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला आहे. ‘सामना’ला नुकतीच पवारांनी एक विशेष मुलाखत दिली असून ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. राऊत यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन मागील अनेक दिवसांपासून या मुलाखतीचे प्रोमो पोस्ट करण्यात येत होते. शनिवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागामध्ये पवारांनी कोरोनापासून ते राज्यातील राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. आजच्या मुलाखतीमध्ये पवार यांनी राज्यातील सरकारच्या प्रगतीपुस्तकासंदर्भात भाष्य केल आहे.

राज्यात अनेक राजकीय नाट्य घडल्यानंतर सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्याचा कारभार हाती घेऊन आता सहा महिन्यापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. सध्या कोरोनाशी ठाकरे सरकार मुकाबला करत असून, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कामाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

आपण सहा महिन्यांपूर्वी राज्यातील राजकारण बदलून टाकले. सहा महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. जसे पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा… अन् मग प्रगतीपुस्तक पालकांकडे येते. तसे सहा महिन्यांचे प्रगतीपुस्तक पालक म्हणून आपल्याकडे आले आहे का?, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, आता ही जी परीक्षा झाली, ती संपूर्ण परीक्षा झाली असे मला वाटत नाही. त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. ही लेखी झाली आहे. लेखीमधील निकालावरून प्रॅक्टिकलमध्येही ते यशस्वी होतील, असे आता दिसत असल्यामुळे त्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणे योग्य नाही.

पण त्याच्यावर संधी नाही, असेही म्हणणे योग्य नाही. राज्याच्या विचाराच्या दृष्टीने या सहा महिन्यात परीक्षेत विद्यार्थी पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा, पुढचे पेपर सहजपणाने पूर्ण करेल, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांविषयी आपण हे सांगत आहात का, असा प्रश्न राऊत यांनी मध्येच विचारला. पवार त्यावर म्हणाले, मुख्यमंत्री, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

चीन प्रश्नावर भूमिका मांडताना चीन हा पाकिस्तानपेक्षा भारताचा मोठा शत्रू आहे, मागील अनेक वर्षांपासूनचे हे माझे मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरे संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

भारतासमोर कोरोनासोबतच आणखीन एक संकट आहे आणि ते म्हणजे चीनचे तर यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे, असा प्रश्न राऊत यांनी पवारांना विचारला. पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना चीन प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा असल्याचे सांगितले. माझा चीन प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा कारण सामान्यपणे आपला विरोधक कोण किंवा शत्रू कोण याचा विचार करतो तेव्हा भारतीय मनात पहिल्यांदा पाकिस्तान येतो.

माझे मागील अनेक वर्षांपासून मत आहे की आपल्याला खरी चिंता पाकिस्तानपासून नाही. आपल्या विचाराचा पाकिस्तान नाही, तो आपल्या हिताच्याविरोधात पावले टाकतो, हेही खरे आहे. पण लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरे संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. आपल्या देशासमोरील चीन हे मोठे संकट आहे. चीन हे संकट असल्याने चीनपासून आपल्या देशाला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही. पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शस्त्र आणि लष्कराच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास चीन विरुद्ध भारत दहाला एक या प्रमाणात गुणोत्तर असल्याचेही पवारांनी सांगितले.

चीनसंदर्भात बोलताना १९९३ साली संरक्षण मंत्री म्हणून चीनमध्ये गेलो होतो, तेव्हाच चीनला महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचा एक अनुभवही पवारांनी या मुलाखतीमध्ये शेअर केला. मागील २० वर्षांपासून चीन महासत्ता होण्यासाठी झटत आहे. आता चीनकडे आर्थिक पाठबळ आले आहे तर तो भारताकडे पाहत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

Leave a Comment