विकास दुबेच्या एनकाऊंटरच्या शक्यतेची सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल झाली होती याचिका


नवी दिल्ली – उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने कुख्यात गुंड विकास दुबेचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला. पण या दरम्यानच एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे विकास दुबेला पोलीस एनकाऊंटरमध्ये ठार करतील, अशी शक्यता व्यक्त करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. विकास दुबेला सुरक्षा दिली जावी अशी मागणीही याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण सुनावणीसाठी ही याचिका येण्याआधीच विकास दुबेचा खात्मा करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त लाइव लॉने दिले आहे.

याचिकेत सांगण्यात आल्यानुसार खोट्या एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या साथीदारांची हत्या करण्यात आली आहे. ही याचिका घनश्याम उपाध्याय या वकिलाने केली होती. गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात झालेल्या एनकाऊंटरची माहितीही याचिकाकर्त्या वकिलाने याचिकेत दिली आहे. विकास दुबेचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणीही वकिलाने केली होती.

त्याचबरोबर विकास दुबेला सुरक्षा पुरवली जावी आणि एनकाऊंटरमध्ये त्याला ठार करणार नाहीत, यासाठी योग्य ती उपाययोजना करत काळजी घेण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारला द्यावेत. न्यायालयात दिलेल्या तारखेला त्याला हजर करण्यासाठीही सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी देखील केली होती. विकास दुबेचे घर पाडल्याबद्दल तसेच साथीदारांची हत्या केल्याबद्दल याचिकाकर्त्या वकिलाने एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली होती. पण ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर येण्याआधीच विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे.. उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला येत असताना नाट्यमय घडामोडींनंतर त्याचा खात्मा करण्यात आला.

Leave a Comment