पोलिसांचे खच्चीकरण होईल अशी वक्तव्ये करु नका; संजय राऊतांचे आवाहन


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कुख्यात गुंड विकास दुबेच्या एनकाऊंटरवर प्रतिक्रिया दिली असून पोलिसांनी हा घेतलेला सूड असल्याचे म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी चकमकीचे समर्थन केले नसले तरी त्यांनी पोलिसांचे खच्चीकरण होईल अशी वक्तव्य करु नका, असे आवाहन केले आहे. संजय राऊत यांनी मोठी नावे बाहेर येऊ नयेत, यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना मला असे वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड असल्याचे म्हटले आहे. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेश किंवा योगींचा हा प्रश्न नाही. देशातील कोणत्याही राज्यात असे झाले, तर पोलीस त्याला सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतात. पण आता जे झाले त्याचे राजकारण होता कामा नये, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केलं. याआधीही देशात अशा घटना झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचे कधीही समर्थन केले नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अनेक राजकारण्यांची गरज म्हणून विकास दुबेसारख्या माणसांची निर्मिती केली जाते. काही राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक पोलीस, राजकारणी तयार करतात. अनेक पक्षांशी विकास दुबेही संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचे राजकारण होणे धोकादायक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एक पक्ष विकास दुबेला विधानसभेचे तिकीट देणार होते. पण त्याने आत्मसमर्पण केले म्हणून त्याला तिकीट मिळाले नाही असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी चकमकीवर बोलताना, त्या राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केले नाही तरी पोलिसांचे खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment