बीसीसीआयने मंजूर केला सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा


नवी दिल्ली – मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्वीकारला असून काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे जोहरी यांनी आपला राजीनामा दिला होता. त्याचबरोबर एप्रिलमध्ये जोहरी यांचा कार्यकाळ संपणार होता. तथापि, त्याला अंतरिम मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंडळाने घेतला होता.

२०१६ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. अखेर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयला त्यावर निर्णय घेता आला नव्हता. परंतु आता त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना दिली.

दरम्यान, बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाले आहे. त्या जागी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयवर प्रशासक (सीओए) नेमण्याचे आदेश दिल्यानंतर संतोष रांगणेकर यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिली होता. त्यानंतर बीसीसीआयने मुख्य वित्तीय अधिकाऱ्याशिवाय आपले काम सुरू ठेवले आहे.

Leave a Comment