ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘Country of Origin’ नमूद करणे बंधनकारक


उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडून (DPIIT) फ्लिपकार्ट, अॅमझॉनसह इतर ई-कॉमर्स कंपन्यांना प्रत्येक उत्पादनावर ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ (Country of Origin) म्हणजेच ते उत्पादन कोणत्या देशात बनले आहे, त्याचा उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात ई-कॉमर्स कंपन्यांना डीपीआयआयटीने (DPIIT) सांगितले आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध असलेल्या उत्पादनांवर ते उत्पादन मूळ कोणत्या देशातील आहे याची माहिती देणे अनिवार्य असेल.

‘कंट्री ऑफ ओरिजिन’ ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रत्येक उत्पादनावर नमूद करण्याच्या लिस्टिंगसाठी सरकारने 1 ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. पण या कंपन्यांच्या पोर्टलवर सध्या उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांसाठी अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. डीपीआयआयटीने सप्टेंबर अखेरपर्यंत नियमांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा मानस आजच्या बैठकीत व्यक्त केला आहे.

आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व उत्पादनांवर 1 ऑगस्टपासून मूळ देशाची माहिती द्यावी लागेल. गेल्या महिन्यात गलवान व्हॅली येथे झालेल्या चकमकीनंतर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी देशातील नागरिकांकडून केली जात आहे. याच भावनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोर्टलवर लाखो उत्पादने असल्याने ई-कॉमर्स कंपन्या यासाठी किमान 3 महिन्यांचा अवधी मागत आहेत. उत्पादनाच्या देशाविषयी माहिती देणे आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करण्यास डीपीआयआयटीने सांगितले आहे.

सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना काल झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. सरकारच्या निर्णयामुळे या सर्व कंपन्या खूश आहेत. गेल्या आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांना कायदेशीर मेट्रॉलॉजी (Packaged Commodities) नियमांचे लवकरात लवकर पालन करण्यास डीपीआयआयटीने सांगितले होते. 2017 मध्ये, सर्व पॅकेज केलेल्या वस्तूंवर त्या उत्पादनाचा तपशील, जसे की उत्पादनाचा मूळ देश, दर्शवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली गेली.

सरकारने नुकताच ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत मिशन’ला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय ई-मार्केटप्लेस (GeM) वर उत्पादनाची नोंदणी करण्यासाठी, मूळ देशाचा उल्लेख करणे आवश्यक असेल. हे नवीन फिचर GeM वर येण्यापूर्वी ज्यांनी आपली उत्पादने यापूर्वीच अपलोड केली होती, त्यांना मूळ देश अपडेट करण्यासाठी नियमितपणे आठवण करून दिली जात आहे. उत्पादनांवर जर मूळ देशाची माहिती नसेल तर, त्यांची उत्पादने GeM वरून काढून टाकली जातील, असे सांगितले होते. अशाप्रकारे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मानिरभर भारत’ ला प्रोत्साहन देण्यासाठी GeM ने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Leave a Comment