संजय राऊतांनी रिलीज केला शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सध्या सत्तेत आहे. हे सरकार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार असल्याचे म्हटले जात आहे. तसा दावा अनेकदा राऊत यांनीदेखील केला आहे. शरद पवार यांची एक मुलाखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतली असून त्यांनी नुकताच आपल्या त्या मुलाखतीचा टीझर ट्विटर अकाऊंटवरून रिलीज केला आहे.


राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली या मुलाखतीचा टीझर रिलीज केला आहे. तीन भागांमध्ये ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर ११ जुलै रोजी या मुलाखतीचा पहिला भाग शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे रिलीज केला जाणार आहे. तसेच त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.

या टीझरमध्ये शरद पवार हे कोरोनापासून सरकार स्थापनेपर्यंत, तसंच राममंदिराशी संबंधित प्रश्नांना उत्तर देत असल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यापूर्वीही राऊत यांनी घेतलेली मुलाखत असो किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत असो, या मुलाखती फारच गाजल्या होत्या. सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आहे. दरम्यान, अनेकदा विरोधकांकडून तीन चाकांचे सरकार अधिक काळ चालणार नाही असा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment