रोजगारासाठी ‘महाजॉब्स’वर बेरोजगारांच्या उड्या : अवघ्या चार तासात १३ हजारांची नोंदणी


मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता टप्प्या टप्प्याने उठवण्यात येत आहे. त्यातच राज्यातील ठाकरे सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली आहे. या ठिकाणी नोंदणी करणाऱ्या किती उमेदवारांना आता नोकरीची संधी मिळणार हे आगामी काही दिवसातच समजेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकेतस्थळाचा मुख्य उद्देश पूर्ण करण्यासोबतच राज्यातील उद्योगचक्र पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे. तरुणांना आणि उद्योजकांना http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरु झाले आहेत. एकीकडे राज्यातील तरुणांच्या हाताला काम नाही आणि दूसरीकडे काही उद्योग मनुष्यबळ नसल्यामुळे ठप्प असल्याची स्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हे संकेतस्थळ राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्यावतीने सुरु करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरुणांना आणि उद्योजकांना होणार आहे. तरुणांनी ही हातची संधी घालवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment