सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; संजय लीला भन्साळींवर पोलिसांच्या प्रश्नांचा भडीमार


मुंबई : मुंबई पोलीस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्यातच काल बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. सकाळी 11.30 च्या सुमारास संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपले अंगरक्षक आणि कायदेशीर तज्ञांसोबत आले आणि ते दुपारी 3.30 च्या सुमारास वांद्रे पोलीस स्टेशनमधून बाहेर निघाले. तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर संजय लीला भन्साळी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही गेले होते. तिथे डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि त्यांच्या टीमने भन्साळी यांची स्वतंत्र एक तास चौकशी केली.

सजंय लीला भन्साळी यांना सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण 30 ते 35 प्रश्न विचारण्यात आले. रामलीला आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातून काढल्यानंतर सुशांत सिंह राजपूत नैराश्यात गेला होता. याबाबत सुशांतसोबत काय चर्चा झाली होती? यावर संजय लीला भन्साली म्हणाले की, सुशांतला कोणत्याही चित्रपटातून मी काढले नव्हते किंवा रिप्लेस केले नव्हते. 2012 मध्ये सरस्वती चंद्र नावाच्या एका मालिकेच्या कास्टिंगदरम्यान माझी सुशांतसोबत भेट झाली होती. पण त्यावेळी सुशांतची या मालिकेसाठी निवड झाली नाही. पण मला त्याचा अभिनय आवडत होता.

त्यानंतर सुशांत सिंह राजपूतला 2013 मध्ये आलेल्या रामलीला आणि 2015 मध्ये बाजीराव मस्तानीसाठी मी दोन वेळा विचारणा केली होती. त्यावेळी तो यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गंत बनत असलेल्या ‘पानी’ चित्रपटाच्या वर्कशॉप आणि शेड्यूलमध्ये व्यस्त होता. एक दिग्दर्शक म्हणून मला त्याचे संपूर्ण लक्ष आणि समर्पण हवे होते. पण त्याच्याच व्यस्त शेड्यूलमुळे सुशांतने स्वत:च या दोन्ही चित्रपटांसाठी मला नकार दिल्यानंतर मी सुशांतला पुन्हा चित्रपटांबाबत कोणतीही बातचीत केली नाही.

मी इतर अभिनेत्यांना/कलाकारांना ओळखतो त्याप्रमाणेच सुशांतला ओळखत होता. माझ्याशी तो वैयक्तिक गोष्टी शेअर करेल एवढी आमची जवळीक नव्हती. त्याच्या नैराश्येबाबत मला काही कल्पना नव्हती. 2016 नंतर मी सुशांत सिंह राजपूतला फक्त तीन वेळा फिल्म शोमध्ये भेटलो होतो, पण यावेळी माझी त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याबाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत चर्चा झाली नसल्याचे संजय लीला भन्साळी यांनी सांगितले.

Leave a Comment