महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही : प्रफुल्ल पटेल


गोंदिया : गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु असून ही चुकीची धारणा आहे. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली, हे खरे आहे. पण मुंबईत आयुक्तांच्या अंतर्गत या बदल्या झाल्या. मंत्रालय किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्वाक्षरी त्यांच्या बदलींच्या पत्रावर नव्हती. तसेच या बदल्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना न दाखवता या बदल्या झाल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काही पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांन रद्द केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना न विचारता गृहमंत्र्यांनी या बदल्या केल्या होत्या का? असा सवाल उपस्थित केला जात होता. तसेच महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याची टीका झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

वारंवार तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा होतात. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय समिती आहे. त्या समितीमध्ये तिन्ही पक्षांचे दोन-दोन मंत्री आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असते. महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. तसेच अनेक कामे केली आहेत. पण महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय कोरोनामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकले नसल्याचे पटेल म्हणाले.

Leave a Comment