कोरोना चाचणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता चाचणीसाठी नाही डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता लक्षणे असलेल्या व्यक्तीला थेट चाचण्या करणे शक्य होणार आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी आत्तापर्यत डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. त्यामुळे अनेक वादही निर्माण झाले होते.

आता महानगरपालिकेच्या नव्या नियमानुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत विनाचिठ्ठी चाचण्या करता येतील. तसेच महानगरपालिकेने खासगी प्रयोगशाळांना प्रयोगशाळेपर्यत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची मुभाही दिली आहे.

अनेक प्रकारच्या चाचण्या आणि पुरेसे संचही कोरोनाच्या निदानासाठी उपलब्ध असल्याने अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्यात. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य विभागाने खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात असे आदेश दिले आहेत. त्यानुसार, चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंबंधीची बैठक सोमवारी झाली असून लवकरच सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे. पण रुग्णांना मोफत चाचण्या करण्यासाठी पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी करावी लागेल. त्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्यांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही घरी जाण्यापूर्वी चाचण्या केल्या जाणार आहेत. जेणेकरून त्या व्यक्तींमध्ये लक्षणे नसली तरी संसर्गाचे निदान केले जाईल. यामुळे ते घरी परत गेल्यावर प्रादुर्भावाचा धोका नसेल. तसेच ज्येष्ठ व्यक्ती आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्या व्यक्तींच्याही चाचण्या केल्या जातील. यासाठी प्रतिजण चाचण्या उपलब्ध केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Leave a Comment