कोरोनाबाधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाने दिले तब्बल २५ लाखांचे बिल


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढत असतानाच मुंबईतील कोरोनाबाधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयाने २५ लाखांचे बिल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

३१ मार्च रोजी डोंगरी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणारे ५८ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम घुगे निवृत्त झाले. वोक्हार्ट रुग्णालयात तुकाराम घुगे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने त्यांच्याकडून यावेळी तब्बल २५ लाखांचे बिल आकारल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांच्या कुटुंबाने मदत मागितली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

यासंदर्भात तुकाराम घुगे यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, घुगे यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून तुकाराम यांची पत्नी सुशिला यांनी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांना २० मार्च रोजी सर्दी आणि ताप आला होता. पण शेवटचे १० दिवस कर्तव्य बजावण्याची इच्छा असल्याने त्यांनी सुट्टी टाकली नाही.

तुकाराम घुगे यांची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टराने दिला. त्यानुसार त्यांची मे महिन्यात कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबई सेंट्रलमध्ये पोलीस कॉलनीत राहत असल्याने वेगळ्या शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तुकाराम घुगे यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नसल्याचे पत्रात सांगण्यात आले आहे.

घुगे यांच्या पत्नी सुशिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम घुगे यांच्यावरच सर्व कुटुंब अवलंबून असून आमच्याकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. सरकार आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा घुगे यांच्या मुलाने व्यक्त केली आहे. आम्हाला मित्र आणि नातेवाईकांनी खूप मदत केली आहे. आता आम्ही गृहविभाग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे मदत मागितली असून ती मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.

आतापर्यंत घुगे यांच्या कुटुंबाने १३ लाख रुपये जमवले असून त्यांना अजूनही गरज आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नियमानुसार पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनाही संपते. तरीही आम्ही मदतीसाठी इतर काही मार्ग शोधत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment