जाणून घ्या काय आहेत ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणे आणि कसा होतो संसर्ग याची माहिती


नवी दिल्ली – कोरोनाचे उगम स्थान असलेल्या चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण उत्तर चीनमधील एका शहरामध्ये आढळून आल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पण या आजाराचा प्राण्यांमधून मानवामध्ये सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान ब्यूबॉनिक प्लेगचे वृत्तसमोर आल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण या आजारासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधताना आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणे आणि कशा प्रकारे याचा संसर्ग होतो याची माहिती देणार आहोत.

ब्यूबॉनिक प्लेगची माहिती

  • ग्लिटीवाला प्लेग असे देखील ब्यूबॉनिक प्लेगला म्हटले जाते.
  • या आजाराने पीडित व्यक्तिच्या शरीरात असह्य वेदना होतात.
  • त्याचबरोबर त्या व्यक्तिला खूप ताप येतो तसेच त्याच्या नाडीचे ठोके वाढतात.
  • त्यानंतर शरीरावर फोड येतात आणि दोन आठवड्यांमध्ये ते पिकतात.
  • शरीरावर फोड आल्यानंतर त्वचेची प्रचंड जळजळ होते.
  • उंदरांमार्फत पसरणारा हा रोग आहे. प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून मानवाला होतो.
  • मानवाला उंदराच्या शरीरावरील पिसवे चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो. उंदीर मेल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्लेगचा संसर्ग मानवाला होतो.

उंदरांमार्फत होणाऱ्या प्लेगचे ब्यूबोनिक आणि न्यूमोनिक असे दोन मुख्य प्रकार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ब्यूबॉनिक प्लेग हा एक सामान्य प्रकार आहे आणि वेदनादायक सूजलेल्या गाठी आणि फोडी तसेच त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडणे ही या प्लेगची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराला त्वचेवर येणाऱ्या फोडींमुळे ब्यूबोनिक (बबल) असे नाव पडले आहे. हा आता एक दुर्मिळ आजार आहे. जगभरात २०१० ते २०१५ दरम्यान ३ हजार २४८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश प्रकरणे ही काँगो, मादागास्कर आणि पेरू देशांमधील आहेत.

या आजाराला मध्ययुगात ‘ब्लॅक डेथ’ देखील म्हटले जाते होते. या आजाराच्या साथीमुळे या काळामध्ये युरोपमधील निम्म्याहून अधिक लोके दगावली होती. तथापि, या आजार उपचार करणे प्रतिजैविकांच्या उपलब्ध झाल्यामुळे शक्य झाले. वेळेवर उपचार न केल्यास ब्यूबॉनिक प्लेगमुळे मरण पावण्याचे प्रमाण ते ३० ते ६० टक्क्यांपर्यंत आहे. तर सेप्टेसीमिक (रक्तप्रवाहात रक्ताभिसरण) आणि न्यूमोनिक प्रकारामध्ये मृत्यूदर हा थेट १०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. वेळेवर निदान करून त्यावर उपचार केल्यास या आजाराचा मृत्यूदर हा केवळ १० टक्के आहे.

ब्यूबोनिक प्लेगची प्रमुख लक्षणे

  • अचानक ताप येणे.
  • थंडी वाजणे.
  • डोके व अंगदुखी आणि अशक्तपणा.
  • उलट्या होणे आणि मळमळ होणे.

या आजारामध्ये शरीरावर लिम्फ नोड म्हणजेच मोठ्या आकाराच्या गाठी तयार होतात. त्याला बल्ब म्हणतात. वेळीच उपचार न मिळाल्यास या गाठीचा आकार एखाद्या कोंबडीच्या अंडाचा आकारऐवढा वाढू शकतो. संसर्गाचे प्रमाण अधिक असेल तर शरीरावरील सूजलेल्या लिम्फ नोड्समधून पू बाहेर पडतो आणि फोडांचे रुपांतर जखमांमध्ये होते. आजाराच्या पुढच्या टप्प्यात तो न्यूमोनिक प्लेगमध्ये रुपांतरीत होतो. मेयो क्लिनिकच्या मते सेप्टिकाइमिक प्लेगमुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन शरीराच्या पेशी मृत होतात. त्यानंतर बोटे आणि नाकाची त्वचा काळी पडते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment