कोरोनाबाधित देशांच्या यादीत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानी


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असून आपला देश आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार रशिला मागे टाकत भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीयांची चिंता वाढवणारी ही झेप आहे. कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, पण त्यांना म्हणावे तसे यश अद्याप तरी मिळालेले नाही.

वर्ल्डोमीटरनच्या आकडेवारीनुसार, 6 लाख 95 हजार 396 वर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. तर रशियामध्ये 6 लाख 81 हजार 251 एवढी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. पण भारताच्या तुलनेने रशियातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या कमी आहे. रशियात आज 6 हजार 736 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका आणि ब्राझील हे दोन आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे आहे, तर ब्राझीलमध्ये ही संख्या 15 लाखांहून अधिक आहे.

अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा 29 लाखांच्या पार गेला, तिथे काल एका दिवसात भारतापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. अमेरिकेत काल 17 हजार 900 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर भारतात काल 21 हजार 492 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave a Comment