तृणमुलच्या खासदाराने केली निर्मला सीतारामन यांची विषारी नागिनीशी तुलना


कोलकाता: तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी निर्मला सीतारामन म्हणजे विषारी नागीण असल्याची विखारी टीका केली. पश्चिम बंगालच्या बंकुरा येथे पेट्रोल दरवाढीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली. कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले की, एखाद्या माणसाचा विषारी नागिणीच्या दंशाने मृत्यू होतो, त्याचप्रमाणे देशातील अनेक निर्मला सीतारामन यांच्यामुळे मरत आहेत. देशाची अर्थव्यवस्था निर्मला सीतारामन यांनी उद्ध्वस्त केली. निर्मला सीतारामन या सध्याच्या घडीला जगातील सर्वात वाईट अर्थमंत्री असल्याचेही कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले.


पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर आक्रमक झाले आहेत. ममता बॅनर्जी यांची पक्षावरची पकड सुटल्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते नैराश्याच्या भरात काहीही बरळत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. तृणमूल काँग्रेसमध्ये वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार पसरला आहे. अनेक नेते पक्षातील अंतर्गत वादांमुळे भरकटले असल्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नेते निरर्थक बरळत असल्याचेही दिलीप घोष यांनी म्हटले.

Leave a Comment