जागतिक आरोग्य संघटनेची कोरोनावरील तीन भारतीय औषधांवर बंदी


नवी दिल्ली – मलेरियावरील औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे कॉम्बिनेशनचे डोस कोरोना रुग्णांना देण्यावर बंदी आणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. या औषधांच्या वापरामुळे मृत्यूदरामध्ये कोणतीही घट झाली नसल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या सूचनेनुसार या दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरात कोणत्याही प्रकारची घट न होता उलट मृत्यूदर वाढत आहे.

यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य सघटनेने याबाबत शनिवारी खुलासा केला आहे. औषधांच्या चाचणीवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार या औषधांच्या वापरावर बंदी आणण्यात येत आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत असल्याने क्लिनिकल ट्रायलवर बंदी आणली होती.

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वेगाने होत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोरोनावरील उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे अमेरिकेसह अनेक देशाच्या प्रमुखांनी या औषधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यात बंदी भारताने उठवण्याची मागणी सर्व प्रमुखांनी केली होती. यानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात भारताने सुरू केली. या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनीदेखील मोदींची स्तुती केली होती.

ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वीच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या कोरोना रुग्णांवरील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यांना चाचणीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे औषध प्रभावी ठरते की नाही हे पहायचे होते. त्याआधी या औषधावर छापून आलेल्या एका लेखामुळे बंदी लादण्यात आली होती.

दरम्यान, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी काही पश्चिमेकडील देशांमधील संशोधकांनी निष्प्रभ म्हटले असले तरीही चीनमधील संशोधकांच्या मते कोरोनामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर या मलेरियावरील ओषधाने कमी होण्यात मोठी मदत झाली आहे.

Leave a Comment