पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण


पुणे : पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे कालच स्पष्ट झाल्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुण्यात आणि महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून महापौर मुरलीधर मोहोळ हे अहोरात्र कार्यरत होते. विशेषतः वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतूदीपासून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोहोळ यांनी कष्ट घेतले.

त्याचबरोबर सातत्याने रुग्णालयांना भेटी देणे, विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः बैठकी घेणे अशी देखील त्यांची दिनचर्य सुरुच होती. त्यांची या काळात पालिकेतील दैनंदिन कामेही सुरूच होती. अनेक नागरिक त्यांना भेटायला येत होते. याच दरम्यान मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती.

त्यांनी या कालावधीत दोन वेळा कोरोनाची चाचणी केली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांना यापूर्वी किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झालेला होता. पण, दरवेळी टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, त्यांनी ताप आल्यामुळे पुन्हा कोरोना टेस्ट करून घेतली. पण यावेळी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आपण लवकरच बरे होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होईन असे, ट्विट महापौरांनी केले होते. पण, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहोळ यांच्या कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये मोहोळ कुटुंबापैकी आठ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली.

Leave a Comment