वाढीव वीज बिलाचा ‘सर्किट’लाही शॉक!


सोशल मीडियावर वाढत्या वीजबिलाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. वाढत्या वीजबिलाचा फटका सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना बसला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे,हुमा कुरेशी या अभिनेत्रींनंतर यात अभिनेता अर्शद वारसीलादेखील वाढीव बिलाचा फटका बसला आहे. त्याने याविषयी ट्विटरच्या माध्यमातून आगपाखड केल्यानंतर त्याची समस्या दूर करण्यात आल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

अभिनेता अर्शद वारसीला एका महिन्यात तब्बल १ लाख ३ हजार ५६४ रुपये बिल आले होते. त्याने बिलावरील आकडे पाहिल्यानंतर ‘हायवे लुटारु’ अदानी यांच्याकडून आलेले हे माझे वीज बिल असे म्हणत सोशल मीडियावर आगपाखड केल्यानंतर ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने त्याच्या या ट्विटला रोखठोक शब्दात उत्तर दिले होते.


आम्ही तुमची चिंता वाढीव बिल आल्यामुळे समजू शकतो, आम्ही याप्रकरणी तुमची मदतही करण्यास तयार तत्पर आहोत. पण वैयक्तिक बदनामी करणारी टीका सहन करणार नसल्याचे प्रत्युत्तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला देण्यात आले होते. त्यानंतर अर्शदची समस्या अदानी इलेक्ट्रिसिटीने सोडविली असून पुन्हा एक नवीन ट्विट अर्शदने शेअर करत समस्या दूर झाल्याचे म्हटले आहे. ट्विट करुन समस्या दूर झाली असून सहकार्य केल्याबद्दल आभार असे, अर्शदने म्हटले आहे.

Leave a Comment