किम कर्दाशिअनचा नवरा लढवणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक


वॉशिंग्टन: कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयश आलेल्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन जनता राष्ट्राध्यक्षपदावरून हटवणार असल्याचे अंदाज आत्तापासूनच वर्तवले जात असल्यामुळे यंदाची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे.

त्यातच आता अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आणि रॅपर केन वेस्ट याने आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केन वेस्टची पत्नी किम कर्दाशिअन हिच्याविषयी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली असून सोशल मीडियावर किम कर्दाशिअन अमेरिकेची फर्स्ट लेडी झाली तर काय होईल, याची मजेशीर मिम्स तुफान व्हायरल होत आहेत.

उद्योगपती एलॉन मस्क यांनीही केन वेस्टच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. तर केनच्या निर्णयाचे किम कर्दाशिअन हिनेदेखील स्वागत केले आहे. २०१५ सालीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा केन वेस्ट याने व्यक्त केली होती.


अखेर त्याने यंदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. पण सध्या केनच्या उमेदवारीपेक्षा सोशल मीडियावर किम कर्दाशिअन फर्स्ट लेडी झाली तर काय होणार, याचीच तुफान चर्चा सुरु आहे. केन वेस्ट आणि किम कर्दाशिअन हे जोडपे कायमच चर्चेत राहिले आहे. २०१४ साली या दोघांनी विवाह केला होता.

दरम्यान, जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येचा मुद्दा यंदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांमध्ये जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांच्याविषयी रोष व्याप्त आहे. अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीरपणे लक्ष्य केले होते.

Leave a Comment