वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु; उपस्थित १०० जणांची वाढली धाकधूक


हैदराबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश झुगारुन हैदराबादमधील एका व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पण ज्याने ही पार्टी दिली होती, त्याचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. जवळपास १०० जणांनी या पार्टीला हजेरी लावली होती. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एका सराफाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने १०० लोकांना आमंत्रित केले होते.

दरम्यान शनिवारी त्या सराफाचे आणि वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्या अन्य एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे आता वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित लावणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. हे सर्वजण सध्या आपली कोरोना चाचणी करण्यासाठी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात गेले आहेत.

हैदराबादमधील आरोग्य अधिकाऱ्यांना, वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झालेली असू शकते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे हैदराबादमधील हिमायतनगर परिसरात सोन्याचे दुकान आहे. या व्यक्तीच्या वाढदिवसाला ज्वेलर्स असोसिएशनमधील १०० जणांची उपस्थिती होती. वाढदिवसाची पार्टी दिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या सराफाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य अधिकारी त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment