डीआरडीओने बनवले जगातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर


नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर रविवारी राजधानी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आले. सरदार वल्लभ भाई पटेल कोव्हिड-19 हॉस्पिटल असे केंटोनमेंटमध्ये बनलेल्या या अस्थायी सेंटरचे नाव ठेवण्यात आले आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉस्पिटलमध्ये 250 आयसीयू बेडसह 10 हजार बेड्स आहेत.

11 दिवसात या कोव्हिड केअर सेंटरला तयार केले असून या हॉस्पिटलचे उद्घाटन दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केले. यावेळी देशाचे गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. डीआरडीओचे चेअरमन जी सतीश रेड्‌डी आणि आयटीबीपीचे चीफ एसएस देसवालदेखील या ठिकाणी आले होते.

राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, डीआरडीओ, गृह मंत्रालय आणि टाटा सन्स अँड इंडस्ट्रीज सह अनेक संघटनांनी सोबत मिळून हे हॉस्पिटल तयार केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशा-निर्देशांनुसार हे हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. जिथे आपण कोरोना रुग्णांना चांगले उपचार देऊन आजारापासून वाचवत आहोत, तर दुसरीकडे सीमेवर सैन्य शत्रुंपासून आपले रक्षण करत आहे.

भारत-तिब्बत सीमा पोलिस (आयटीबीपी) प्रमुखांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान म्हटले की, भारतीय सैन्याचे मनोबल वाढले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जवान आपले प्राण पणाला लावत आहे. आयटीपीचे डायरेक्टर जनरल (डीजी) एसएस देसवाल म्हणाले की, पंतप्रधानांच्या लडाख दौऱ्यामुळे सैन्याचे मनोबल, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Leave a Comment