‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना ७ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स


संगमनेर – आपल्या किर्तनातून किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. आज संगमनेर सत्र न्यायालयात याप्रकरणी पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने यावेळी इंदुरीकर महाराजांना समन्स बजावले असून त्यांना येत्या सात ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा इंदुरीकर महाराज यांनी भंग केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हे पुरावे दिले होते. पण कारवाई होत नव्हती.

अखेर जिल्हा शल्य चिकित्सक यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी कायदेशीर नोटीस बजावली. त्यामध्ये इंदुरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. गवांदे यांनी नोटीसमधून दिला होता. राज्य आरोग्य विभागाकडे देखील ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीची बैठक झाली.

या बैठकीत आलेल्या तक्रारी, इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे व्हिडिओ, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा विचार करण्यात आला. पीसीपीएनडीटी समितीने त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदिल दिला. त्यानुसार संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी तक्रार आणि पुराव्याचे कागदपत्र संगमनेरच्या प्रथम वर्ग-एक न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी झाली. येत्या सात ऑगस्टला इंदुरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment