टेनिसपटू नोवाक जोकोविचची कोरोनावर यशस्वी मात


नवी दिल्ली – 24 जून रोजी जगातील अग्रमानंकित टेनिसपटू आणि सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. तर, त्यांच्या मुलांची चाचणी निगेटिव्ह आली होती. पण आता याच दिग्गज खेळाडूने त्याच्या पत्नीसह कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

जोकोविचला सर्बिया आणि क्रोएशिया येथे आयोजित केलेल्या अ‌ॅड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेदरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आले. पण या दोघांचाही कोरोना चाचणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला आहे.

जोकोविच हा अ‍ॅड्रिया टूरमध्ये भाग घेतल्यानंतर कोरोनोव्हायरसची लागण झालेल्या टेनिसपटूंमध्ये पॅाझिटिव्ह असणारा चौथा खेळाडू होता. त्याच्या आधी डेनवर नगेट्सकडून खेळणारा एनबीए खेळाडू निकोल जोकिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. जोकिकने जोकोविचसोबत वेळ घालवला होता. तर, माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेव्हिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते. किर्गिओसने या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली होती. या स्पर्धेदरम्यान ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.

Leave a Comment