पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ५०ने वाढ


पुणे – देशात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच मुंबई आणि पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमधील कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला आहे, तर या जीवघेण्या रोगाने सहाशे पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुण्यातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात गुरूवारी तब्बल ५० कंटेनमेंट झोन वाढले आहेत. पुण्यात आता एकूण १०९ कंटेनमेंट झोन झाले आहेत. १७ जूनपर्यंत शहरात कंटेनमेंट झोनची संख्या ७४ एवढी होती. ती संख्या कमी होण्याऐवजी आता वाढल्यामुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे महानगरपालिकेकडून जुन्या कंटेनमेंट झोनचा आढावा घेताना १५ क्षेत्रे वगळण्यात आली. तर ५० ठिकाणांचा नव्याने समावेश करण्यात आला. एकूण ७४ पैकी ९ क्षेत्रांची फेररचना करून सुधारणा करण्यात आली. सध्या प्रतिबंधित क्षेत्र ६.६९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढलेल्या कंटेनमेंट झोनमुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कंटेनमेंट झोनमध्ये जाण्या-येण्याचे मार्ग बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. शहरातील कंटेनमेंट परिसर महापालिकेमार्फत सील करण्यात आले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्राचा दर काही दिवसांनी आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राची सुधारित यादी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये या नव्या ठिकाणांची वाढ झाली आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहिर केलेल्या नव्या कंटेनमेंट झोन्सची यादी
सदाशिव पेठेतील राजेंद्रनगर, मनपा कॉलनी, पर्वती दर्शन परिसरातील चाळ क्रमांक ६७, ७०, ९३, ९९, १०७, साईबाबा वसाहत परिसर, गणेश पेठेतील संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंतचा लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता परिसर, घोरपडी येथील शक्तिनगर परिसर, ढवळे वस्ती, हडपसरमधील सव्‍‌र्हे क्रमांक २८२, मुंढवा परिसर, अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी परिसर, शाहू कॉलेज रस्ता परिसर, कात्रज परिसरातील अय्यप्पा मंदिरालगतचा परिसर, शिवशंकर कॉलनी, बिबवेवाडी ओटा वसाहत, अपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज परिसर, येरवडा येथील अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, रामनगर, जय जवान नगर, यशवंतनगर, पर्णकुटी पायथा, शनी आळी, गवळीवाडा, हडपसरमधील अण्णा भाऊ साठे वस्ती, लक्ष्मीनगर, संगमवाडी, शिवाजीनगर, वाकडेवाडी, संभाजीनगर, महापालिका वसाहत, खराडीमधील थिटे वस्ती, थिटेनगर, भेकराईनगर, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी येथील चैत्रबन परिसर, एरंडवणे येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसर, कर्वे रस्त्याचा काही भाग, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीजवळील वसाहत, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे बुद्रुक, पौड फाटा, मेगा सिटी, के ळेवाडी, राजीव गांधी वसाहत, डहाणूकर कॉलनी या भागाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.

Leave a Comment