आता विस्तारवादाचे नव्हे तर विकासाचे युग; चीनला मोदींचा इशारा


लेहः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज अचानक लडाखमधील लेह येथे भेट देत सीमेवरील सैनिकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर चीनला त्यांनी आपल्या भाषणातून इशारा दिला. विस्तारवादाचे युग संपले असून जागतिक शांतता आणि संपूर्ण मानवतेसाठी विस्तारवाद हा धोकादायक आहे. मानवजातीचा विस्तारवादाने नाश केला. विस्तारवादाच्या विरोधात संपूर्ण जगाने आपले मन बनवले असून सध्या विकासाचे युग असल्याचे मोदी म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या सैनिकांशी संवाद साधताना तुमचे शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले समर्पण हे अतुलनीय आहे. ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी तुम्ही भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची जगात कशाचीच तुलना होऊ शकत नाही. तुमचे साहस, हिमालयातील पर्वतरांगांपेक्षाही तुमचे शौर्य मोठे असल्याचे म्हटले. येथील पर्वतरांगांसारखेच बळकट तुमच्या बाहू आहेत. तुमची इच्छाशक्तीही प्रबळ आहे, हा सगळा अनुभव मी घेतो आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरल्याचे म्हणत त्यांनी जवानांचे मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राष्ट्र कवी रामधारीसिंग दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी पंतप्रधान मोदींनी म्हटल्या, ‘राष्ट्रकवी रामधारीसिंग दिनकर जी यांनी असे लिहिले आहे… जिनके सिंहनाद से सहमी, धरती रही अभी तक डोल।
कलम, आज उनकी जय बोल, मैं आज अपनी वाणी से आपकी जय बोलता हूं।।

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, गलवाण खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्याचे सामर्थ्य, त्यांच्या पराक्रमामुळे पृथ्वी अजूनही त्यांचा जयजयकार करीत आहे. प्रत्येक देशवासिय आज तुमच्यासमोर आदरपूर्वक नतमस्तक आहे. आज प्रत्येक भारतीयांची छाती तुमच्या शौर्याने आणि पराक्रमाने फुलली आहे.

Leave a Comment