चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबाबत महत्त्वाची घोषणा; केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी


मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा केली. पंकजा मुंडेंना केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर विधानसभेतील मुख्य प्रतोद हे आशिष शेलार आणि माधुरी मिसाळ हे असतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पण पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. केशव उपाध्येंना भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

केंद्र कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना चांगली जबाबदारी मिळेल, त्या १०० टक्के कोअर कमिटीच्या सदस्या असतील. त्यांची केंद्रातील जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी काही वेळापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोन वेगळ्या खासदार असल्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांच्या कामामुळे पंकजा मुंडेंना ही जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना ही जबाबदारी नाराज असल्यामुळे दिली नसल्याचे त्याचबरोबर आमच्या पक्षात कुणीही नाराज नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपाची कार्यकारिणी कोरोना संकटामुळे जाहीर करायची राहिली होती. सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन कोणतीही घोषणा करायची असते, त्यामुळे थोडा वेळ लागला. १२ प्रदेश उपाध्यक्ष माझ्याबरोबर आहेत. पाच सरचिटणीस आहेत. त्याशिवाय एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटन असे सहा सरचिटणीस आहेत. एक खजिनदार आणि १२ सरचिटणीस आहेत.

Leave a Comment