मोफत उपचारांबाबत राजेश टोपेंची सुरु आहे बनवाबनवी


मुंबई – देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वांनाच उपचार घेता येतील असे निश्चित केले आहे.

याबाबत आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्ण तसेच कोरोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी नागरिकांना उपचार घेता येणार आहेत. पण, राज्य सरकारची ही योजना फसवी, असल्याचे सांगत मनसेने आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कोरोना रुग्णालयात राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे रुपांतर करण्यात येत आहे. शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य १२० उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. तसेच, याच योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरही मोफत उपचार होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 लाख 20 हजार रुग्णांवर मोफत उपचार झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले आहे. पण आरोग्यमंत्र्यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हणत मनसेने राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या योजनेचा केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांनाच फायदा होत असून योजना फसवी असल्याचे मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. मुळातच महात्मा फुले जनआरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्यावर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते.

मग १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असताना या योजनेतून १ लाख २० हजार रुग्णांना लाभ कसा मिळू शकेल असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे खोटे बोलत असून ते उल्लू बनवत आहेत, त्यांनी त्यासाठी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अन्यथा महाराष्ट्राची माफी मागत मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment