कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार मानत न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा


वेलिंग्टन – आपला देश कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता देशवासियांना दिल्यानंतर न्यूझीलंडमधील लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली. पण देशातील नागरिकांनी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. न्यूझीलंडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाची प्रकरणे काही दिवसांपूर्वी नोंदवली गेली. पण या क्वारंटाईन सेंटरच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे मान्य करत न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंड सरकारने कोरोनासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका झाल्यानंतर डेव्हिड क्लार्क यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर ते लॉकडाऊन दरम्यान कुटुंबियांसमवेत समुद्रकिनारी फिरायला गेले होते. दरम्यान गुरुवारी डेव्हिड क्लार्क यांचा राजीनामा घेतल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी जाहीर केले.

यापूर्वी डेव्हिड क्लार्क यांना हटवण्यास पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी नकार दिला होता. डेव्हिड क्लार्क यांनी देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण आता आपण डेव्हिड क्लार्क यांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे पीएम जसिंडा आर्डर्न यांनी सांगितले. जूनच्या सुरुवातीला न्यूझीलंडला जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनामुक्त म्हणून घोषित केले.

कोरोनामुक्त घोषित केल्याच्या काही दिवसानंतर न्यूझीलंडमध्ये ब्रिटनहून परत आलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. या दोन्ही महिलांना शिफारशीवरून विलगिकरण केंद्र सोडण्याची परवानगी देण्यात आल्यातर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सध्या देशात कोरोनाची 22 सक्रिय प्रकरणे आहेत जी वेगवेगळ्या देशांतून आली आहेत.

Leave a Comment