तब्बल 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार अॅमेझॉन


नवी दिल्ली : दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या अॅमेझॉन इंडियाकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. कोणत्याही व्यत्ययाविना भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांना सेवा देता यावी म्हणून अॅमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासंदर्भात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. कंपनीचा असा अंदाज आहे की, साईटवरील ग्राहकांची रहदारी पुढील सहा महिन्यांत वाढणार आहे, त्यासाठी आधीच तयारी करण्यात येणार आहे. देशभरातील काही शहरांमध्ये पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत नव्या कामगारांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.अॅमेझॉन हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.

त्याचबरोबर 20 हजार पदांपैकी अनेक पदे ‘व्हर्चुअल ग्राहक सेवा’ कार्यक्रमाचा हिस्सा असतील. यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे. तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत. याबाबत माहिती देताना अॅमेझॉन इंडियाचे संचालक अक्षय प्रभु यांनी सांगितले की, सतत वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी आम्ही वाढत्या मागणीचे निरंतर मूल्यांकन करीत आहोत. पुढील सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या वाढेल, असा आमचा अंदाज आहे.

Leave a Comment