मुंबई महापालिकेच्या ११ कोटींच्या वर्क ऑर्डर तब्बल ६ कोटींचा घोटाळा; चंद्रकांत पाटील यांचा आरोप


मुंबई – देशात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना प्रसार रोखण्याबरोबर रुग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या वतीने केल्या जात असल्याचे दिसून येत असतानाच मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेने काढली असून, त्यात तब्बल ६ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे.


महापालिकेने सुरूवातीला कोविड सेंटरचे काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचे सांगितले होते, पण महापालिकेने प्रत्यक्षात त्यासाठी ११ कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू या ३ महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आले.

उदाहरणार्थ – २ हजार उभे फॅन हे १ कोटी ८० लाख रुपयांनी भाड्याने घेतले मात्र, त्याची बाजारातील किंमत ही ७० लाख रुपये एवढी आहे. ८० सीसीटीव्ही हे ५७ लाख ६० हजार रुपयांनी भाड्याने घेतले, मात्र याची बाजारातील किंमत ही ८ लाख रूपये एवढी आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना, रोज कित्येक निष्पाप लोकांचे प्राण जात असताना मुंबई महानगरपालिका प्रशासन मात्र जनतेचे पैसे लुबाडण्यात मग्न आहे. एक माणूस म्हणून एवढ्या खालच्या पातळीला कसे कोण जाऊ शकते? सत्ताधारी यावर तरी कारवाई करणार का? प्रशासनाच्या कारभारात जे चालू आहे ते खरच खूप धक्कादायक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment