ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आलिया भट्टचा ‘सडक २’


बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या हिट चित्रपटांच्या यादी दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘सडक’ या चित्रपटाचा आवर्जुन समावेश होतो. त्याच ‘सडक’ या हिट चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच मुकेश भट्ट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे समोर आले आहे.

नुकतीच पीटीआय या वृत्तसंस्थेला मुकेश भट्ट यांनी मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीमध्ये सडक २ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह उघडणार असे तुम्हाला वाटते का? आणि जरी सुरु झाली आणि सडक २ प्रदर्शित केला तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातील? प्रत्येकाला आपल्या कुटुंबियांची काळजी असल्याचे त्यांनी म्हटले. मला सध्याच्या परिस्थितीने सडक २ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास भाग पाडले आहे. माझ्याकडे हा एकच पर्याय असल्याचे मुकेश भट्ट यांनी पुढे म्हटले आहे.

अभिनेत्री पूजा भट्ट ‘सडक’ चित्रपटात मुख्य भूमिकेत होती आणि आता देखील पूजा ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह चित्रपटात आलिया देखील झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

Leave a Comment