कोरोनाच्या लक्षणात आणखी तीन नव्या लक्षणांची वाढ !


मुंबई : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता या कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण आजवर आपल्याला कोरोनाच्या लक्षणात ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा अशांच समावेश होता, पण आता या रोगाची तीन नवीन लक्षणे समोर आली आहेत. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना व्हायरसचे संभाव्य संकेत मान्य केले आहेत.

कोरोनाच्या तीन नव्या लक्षणात नाक वाहणे, मळमळ होणे आणि अतिसार यांचा समावेश आहे. सीडीसीच्या मते, जर सातत्याने एखाद्या व्यक्तीचे नाक वाहत असेल आणि त्याला अस्वस्थ वाटत असेल, शिवाय ताप नसेल तरीही अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी.

त्याचबरोबर कोरोनाचे मळमळ होणे हे आणखी एक लक्षण असल्याचे अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीला जर वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखे वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करायला हवे. पण मळमळ होण्याची इतर कारणे देखील असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करु नये. सातत्याने असे होत असल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करायला हवी. तसेच अतिसार कोरोना तिसरे नवे लक्षण असून याआधीही डॉक्टरांनी मान्य केले होते की अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये असतात. आता सीडीसीनेही मान्य केले आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळले आहेत.

सीडीसीच्या यादीत या तीन नवीन लक्षणांसह कोरोना व्हायरसची एकूण 11 लक्षणे झाली आहेत. यापूर्वी शरीरात होणारे आठ बदल हे कोरोनाचे संभाव्य संकेत समजले जात होते. ताप आणि थंडी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चव न कळणे, घसादुखी आणि खवखव यांचा आठ लक्षणांमध्ये समावेश आहे.

इतरांनाही कोरोनाबाधित रुग्ण संक्रमित करु शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. वयोवृद्ध लोकांनी तसेच ज्यांना दमा, मधुमेह, हृदयविकार आहेत, त्यांच्यासाठीही कोरोना व्हायरस घातक ठरु शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्षणे ओळखणे अतिशय आवश्यक आहेत. लक्षणे ओळखूनच व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतो. सुमारे 45 टक्के कोरोनाबाधित हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

Leave a Comment