आयात बंदीचा औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेल्या कच्चा मालाला फटका


नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात चिनी लष्करासोबत झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात सध्या चीनविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच देशातील नागरिकांकडून चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पण चीनमधून आयात बंदीच्या मागणीचा फटका सध्या भारतीय औषध कंपन्यांना बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडल्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यासाठी वरिष्ठ सरकारी कार्यालये आणि पंतप्रधान कार्यालयाला भारतीय औषध कंपन्यांनी आयातीला मंजुरी देण्यासाठी साकडे घातले आहे. चीनमधून औषध निर्मितीसाठी मागवलेला कच्चा माल, द्रव्य, कोरोना उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत.

यासंदर्भातील वृत्त सीएनबीसी टीव्ही १८ ने दिले. हा माल बंदरामधून बाहेर निघाला तर औषध कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण हा माल आवश्यक मंजुरीविना अजून बंदरामध्येच आहे. आयातील प्राधान्य देऊन झटपट मंजुरी दिली नाही तर ९० ते १०० टक्के उत्पादन कायम ठेवणे कठिण आहे तसेच कोरोनाच्या या संकटकाळात औषध पुरवठयाची साखळी सुद्धा विस्कळीत होईल असे औषध क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी औषध उद्योगाने केली आहे. औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत, पण आत्मनिर्भर होण्यास अजून काही कालावधी लागेल, असे औषध क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment