नियमबाह्य पध्दतीने हळदी आणि लग्न नवरदेवाला पडले चांगलेच भारी; कोरोनामुळे भावाचा मृत्यू, 12 जण पॉझिटिव्ह


पनवेल : नियमबाह्य पध्दतीने हळदी समारंभ आणि लग्न करणे पनवेलमधील नेरे गावातील नवरदेवाला चांगलेच भारी पडले आहे. या नवरदेवाला आपल्या मोठ्या भावाला मौजमजा, हौस आणि मोठेपणासाठी गमवावे लागले. नवरदेवाच्या भावाचा मोठ्या प्रमाणात जमवलेल्या गर्दीमुळे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमात सहभागी झालेले गावातील इतर 12 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या कोरोनाची दहशत संपूर्ण गावावर असून संपूर्ण गावच लॉकडाऊन करण्यात आले आहे.

मुलाचा लग्न समारंभ नेरे गावातील वामन पाटील यांनी आयोजित केला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव जितेश पाटील याने हळदीचा मोठा बेत ठेवला होता. हळदीला थोडे थोडके नाही तर चक्क 400 ते 500 जणांनी हजेरी लावली होती. सर्वांसाठी खेकडे, मासे, मटनाची मेजवानी होती. एकीकडे गर्दी जमवू नका असे राज्य सरकार सांगत असताना दुसरीकडे सर्व नियम पायमल्ली करत लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला गेला. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभातही मोठी गर्दी जमविण्यात आली होती. 50 लोकांना परवानगी असतानाही जास्त लोक आले होते. विशेष म्हणजे एवढे सर्व होत असताना ना स्थानिक पोलीसांचे, ना तहसीलदारांचे लक्ष होते.

कोरोना संसर्गामुळे अखेर या गर्दीचे बिंग फुटले. नवरदेवाचा मोठा भाऊ जितेंद्रला कोरोनाने गाठले. त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गावातील इतर 12 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. संपूर्ण गाव सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. हळदी समारंभ आणि लग्न समारंभाला गर्दी केल्या प्रकरणी नवरदेव , वडील आणि मुलीचे वडील असे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment