पाक सरकारनेच उघड केली आपल्याकडे ३० टक्के बनावट पायलट असल्याची माहिती


इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने आपल्याच देशातील एक धक्कादायक माहिती जगासमोर आणली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानातील दर तीन पायलटमागे एका पायलटचा विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना हा बनावट आहे. दरम्यान पाकिस्तानने अशाप्रकारचे संशयास्पद परवाने असलेल्या १५० पायलटना विमानांचे उड्डाण करण्यापासून रोखले आहे. पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एक मोठा विमान अपघात झाला होता. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तानातील ८६० पैकी २६२ पायलटचे परवाने बनावट असल्याची कबुली पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) प्रवक्त्यांनीही दिली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पायलटना विमान उडवण्यापासून रोखल्यामुळे देशातील विमान उड्डाणांवर परिणाम होणार आहे. त्याबरोबर यापूर्वीच अशा बनावट पदवीधारक पायलटची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पीआयएच्या प्रवक्त्यांनी दिली. ज्या पायलटचे परवाने बनावट नसल्याचे सिद्ध होईल त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेतले जाणार असल्याची माहिती पीआयएच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिली आहे. ८६० पैकी २६२ वैमानिक असे आहेत ज्यांनी पायलट होण्यासाठी आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केली नाही. याचाच अर्थ प्रत्येक तीन पायलटपैकी १ पायलट हा बनावट आहे.

कराची येथील विमान अपघाताचा खान यांनी अहवाल सादर केला. राजकीय दबाव आणि त्यांच्या हस्तक्षेपाच्या आधारावर पीआयएमध्ये पायलटची नियुक्ती होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्यावेळी फेब्रुवारी २०१९ मध्ये तपास सुरू झाला तेव्हा २६२ जणांनी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेत आपल्या जागी अन्य कोणत्या व्यक्तीला पाठवल्याचे समोर आले. त्यांच्याकडे विमानांचे उड्डाण करण्याचाही अनुभव नव्हता. आता या क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उर्वरित परवान्यांची यादी पाठविण्यास आम्ही नागरी उड्डयन प्राधिकरणाला सांगितले आहे. आम्हाला अहवाल मिळाला आहे आणि आम्ही आमचा स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरी उड्डयन प्राधिकरणाला एक पत्र लिहून पीआयएच्या अध्यक्षांनी संशयास्पद आणि बनावट परवान्यांसह उर्वरित पायलटचा तपशील मागवल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले. बनावट परवाने असलेल्या सर्व पायलटवर कारवाई केली जाईल. व्यावसायिक कामकाज सुरक्षित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असे अध्यक्षांनी म्हटल्याची माहितीही पीआयएच्या प्रवक्त्यांनी दिली.

Leave a Comment