आता ट्रायच्या TV Channel Selector अॅपच्या साहाय्याने निवडा तुमच्या आवडत्या वाहिन्या


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने ग्राहकांना टिव्हीवरील हव्या त्या वाहिन्या निवडता याव्यात यासाठी एक खास अॅप आणले आले आहे. या अॅपचे नाव TV Channel Selector असे असून ग्राहक ज्याद्वारे आपल्या पसंतीच्या वाहिन्या निवडू शकणार आहेत. तसेच, आपल्याला आवडत नसलेल्या वाहिन्या हटविण्याची सुविधाही या अॅपमध्ये देण्यात आली आहे. हे अॅप ट्रायने गुरुवारपासून (25 जून) ग्राहकांच्या सेवेत सुरु केले आहे.

ट्रायने अॅपबद्दल माहिती देताना सांगितले की, प्रसारण सेवांसाठी नवे दर निश्चित केल्यानंतर असे लक्षात आले की आपल्या आवडत्या वाहिन्या निवडण्यात ग्राहकांना अडचण येत आहे. त्यांना वाहिनी सेवा उपलब्ध करुन देणारे सेवादारांच्या संकेतस्थळांवरही ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. ट्रायने लॉन्च केलेले हे अॅप सर्व ऑपरेटर्स यांच्याकडून माहिती घेऊनच तयार करण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर अनेक मोठ्या डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या, मल्टी सिस्टम ऑपरेटरची (एमएसओ/केबल ऑपरेटर) माहिती उपलब्ध आहे. याद्वारे असा प्रयत्न केला जात आहे की, या माहितीसोबत इतर सेवादात्यांनाही जोडले जाईल, असे ट्रायने म्हटले होते. तसेच ‘टीव्ही चॅनल सेलेक्टर अॅप’ टीव्हीवर वाहिन्या पाहणाऱ्या ग्राहकांसाठी पारदर्शक आणि विश्वासू व्यवस्था देण्याच्या हेतून सुरु करण्यात आले आहे.

अॅपवरील सर्व ग्राहकांची ओळख ही एकवेळ वापरण्यात येणारा सांकेतांक (ओटीपी) वापरुन केली जाणार असल्यामुळे ग्राहकाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सांकेतांक क्रमांक पाठविण्यात येईल. जर एखाद्या ग्राहकाने सेवापुरवठादाराकडे आपला नोंदणीकृत क्रमांक नोंद केला नसल्यास हा सांकेतांक टीव्हीच्या स्क्रिनवर दिसेल. हे अॅप गूगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरवर उपलब्ध आहे.

Leave a Comment