नशीबवान! खाणीत सापडलेल्या दुर्मिळ रत्नामुळे एका रात्रीत कोट्याधीश झाला कामगार

नशीब अशी गोष्ट आहे जी कधी बदलेल सांगता येत नाही. क्षणात नशीब बदलून एखादी गरीब व्यक्ती कोट्याधीश झाल्याच्या घटना याआधी देखील समोर आल्या आहेत. असेच काहीसे टंझानिया येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारासोबत घडले आहे. कामगाराला खाणीत आतापर्यंतचे दोन सर्वात मोठे आणि दुर्मिळ रत्न सापडले आहेत. सरकारने या व्यक्तीला त्या दोन टंझानाइट रत्नांच्या बदल्यात 7.74 बिलियन टंझानिया शिलिंग (जवळपास 25 कोटी 36 लाख रुपये) दिले आहेत.

हे दुर्मिळ रत्न सॅनिन्यू लैझर या व्यक्तीला देशातील उत्तर भागातील एका खाणीत सापडले. हे दोन्ही रत्न गडद जांभळ्या निळ्या रंगाचे आहेत. टंझानियाच्या खाण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एका रत्नाचे वजन 9.27 किलो आणि दुसऱ्याचे वजन 5.103 किलो आहे. सॅनिन्यू लैझर यांची 4 लग्न झाली असून, त्यांना तब्बल 30 मुले आहेत.

टंझानिया रत्न केवळ पुर्व आफ्रिकेतील देशातील उत्तर भागातील एका छोट्याशा क्षेत्रात आढळतात. खाण मंत्रालयाचे सचिव सिमॉन म्संजिला यांनी म्हटले की, मीरानी खाण कामाची सुरुवात झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच दोन सर्वात मोठे टंझानाइट रत्न सापडले आहेत. रत्न सापडणाऱ्या सॅनिन्यू यांनी चेक देण्याचा कार्यक्रम टिव्हीवर लाईव्ह दाखवण्यात आला. राष्ट्रपती जॉन मगुफूली यांनी या नशीबवान व्यक्तीला फोनवरून शुभेच्छा दिल्या. या दोन रत्नांना टंझानियातील बँकेने खरेदी केले आहे.

Leave a Comment