आयुष मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कोरोनिलच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी


मुंबई: कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने लाँच केले होते. औषधाच्या लाँचिंग दरम्यान बाबा रामदेव यांनी हे आयुर्वेदिक औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. पण पतंजली कंपनीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला या औषधाची योग्य ती माहिती न दिल्यामुळे कोरोनिल औषधाची जाहिरात योग्य तपासणी होईपर्यत न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले होते. राज्यातील ठाकरे सरकारने देखील आयुष मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कोरोनिल औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात कोरोनिल औषधावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर भाजपने पतंजलीचा बचाव करण्यास सुरुवात केली होती. औषधावर कोणत्याही चाचणीशिवाय बंदी घालणे चुकीचे असल्याचे मत भाजप आमदार नेते राम कदम यांनी व्यक्त केले होते. तसेच रामदेव बाबांसाठी देशभरातूनही भाजपने बॅटिंग करण्यास सुरुवात केली होती. पण अनिल देशमुख यांनी याकडे दुर्लक्ष करत पतंजली कंपनीला तंबीच दिली आहे.

आयुष मंत्रालय किंवा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सची पतंजली कंपनीने कोरोनिल हे औषध आणताना परवानगी घेतली नाही. संबंधित अॅथोरिटीकडून कोणतेही औषध बाजारात आणताना परवानगी घ्यायला हवी. पण ही परवानगी पतंजलीने न घेतल्यामुळे कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनिलची जाहिरात किंवा विक्री महाराष्ट्रात केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पतंजलीसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Comment