कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस टू फेस वर्ग न घेण्याचा मुंबई आयआयटीचा निर्णय


मुंबई : देशासह राज्यात असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीने पुढील सुरू होणारे सेमिस्टर हे फेस टू फेस वर्ग न भरवता संपूर्ण सेमिस्टर ऑनलाईन वर्ग घेऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सेमिस्टर कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत कसे सुरू करावे? याबाबत पर्यायावर मुंबई आयआयटी सिनेटसोबत चर्चा सुरू असताना अखेर संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता पुढील सेमिस्टर हे पूर्णपणे ऑनलाईन घेण्यात यावे, असे ठरले असून आता त्यासाठी मुंबई आयआयटीकडून तयारी केली जात आहे. त्याचबरोबर या कोरोना महामारीच्या काळात अशा प्रकारचा निर्णय घेणारी मुंबई आयआयटी ही देशातील पहिली संस्था म्हणून समोर आली आहे.

याबाबत माहिती देताना मुंबई आयआयटीचे संचालक सुभाषिश चौधरी यांनी सांगितले की, पुढील शैक्षणिक वर्षाला सुरू होण्यास अधिक उशीर होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते कधी आणि कसे सुरू होतील? याबाबत विद्यार्थ्यांना लवकरच कळवले जाणार आहे. त्याचबरोबर आयआयटीतील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीचा सुद्धा विचार आपण यामध्ये केला असून हे ऑनलाईन शिक्षण सुरू करत असताना एकही विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी पूर्णपणे संस्था नियोजन करत असून याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे.

ऑनलाईन शिक्षण सुरू करायचे झाल्यास त्यासाठी प्रत्येकाला आवश्यक कंप्यूटर, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन या सुविधा मिळाव्यात जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हे ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहतील. यासाठी प्रयत्न केले जात असताना ऑनलाईन शिक्षणासाठी साधारण 5 कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचे सांगितल्यामुळे या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये व हे ऑनलाईन शिक्षण प्रत्येकाला घेता यावे म्हणून मुंबई आयआयटीच्या संचालकांनी मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी व इतरांना या कामासाठी मदत करावी, असे आवाहन फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.

साधारणपणे जुलैपासून मुंबई आयआयटीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुढील सेमिस्टरचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आखले असून याद्वारे फेस टू फेस क्लास म्हणजेच विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळता यावा यासाठी वर्गात उपस्थित राहण्याची गरज नसून हे विद्यार्थी आता ऑनलाईनद्वारे वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील. त्यामुळे कोरोनाच्या संकटात मुंबई आयआयटीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून येत्या काळात असा निर्णय इतर संस्था सुद्धा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Leave a Comment