राजधानी दिल्लीत पेट्रोलपेक्षा महाग झाले डिझेल


नवी दिल्ली : देशातील इंधनांच्या दरात होत असलेली वाढ कायम असून आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलग अठराव्या दिवशी आज (24 जून) डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर कालएवढेच आहेत. दरम्यान डिझेलच्या दरात मागील 18 दिवसात प्रति लिटर 10.48 रुपयांची तर पेट्रोलच्या दरात 8.50 रुपयांची वाढ झाली आहे.

मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले. पण याचे दर भारतीय बाजारात सातत्याने वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशोबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे. पेट्रोलचे दरही या अठरा दिवसात 8.50 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत.

एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर होता, तर सर्वाधिक मुंबईत होता. 4 मे रोजी दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी 27 टक्के असलेला व्हॅट आता 30 टक्के करण्यात आल्यामुळे पेट्रोलच्या दरात 1.67 रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दर 7.10 रुपयांनी वधारले.

डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत अंतर असण्याचे कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर कमी कर आकारते. पण सरकारचे ऑक्टोबर 2014 मध्ये इंधन दरावरील नियंत्रण हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर फारच कमी होत गेले. आता दिल्लीत तर अशी परिस्थिती आहे की, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे. पण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त आहे. खरतर पेट्रोलवर दिल्लीमध्ये 64 टक्के कर आकारला जातो आणि डिझेलवर 63 टक्के कर आहे. कर समान असल्याने त्यांच्या दरातील अंतर जवळपास संपले आहे.

Leave a Comment