जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील 24 तासांत 1.60 लाख नव्या रुग्णांची वाढ - Majha Paper

जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील 24 तासांत 1.60 लाख नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – जगभरातील प्रत्येक देशामध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असल्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार 93 लाखांवर जगभरातील कोरोबाग्रस्तांचा आकडा पोहचला असून आतापर्यंत या जीवघेण्या रोगाने चार लाख 78 हजार रुग्णांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर 50 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगभरातील जवळपास 66 टक्के रुग्ण फक्त 10 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 62 लाखांहून अधिक आहे.

जगभरातील इतर देशांपैकी कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेतील 24 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख 23 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण आता अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये दरदिवशी जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढताच आहे. गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 35,991 रुग्ण आढळून आले आहेत. तर 863 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 40,131 रुग्ण आढळून आले असून 1,364 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, भारत, पेरू, चिली, इटली, इराणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारताचा टॉप-4 कोरोना बाधित देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

Leave a Comment