सानियाला भेटल्यानतंर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार शोएब मलिक


नवी दिल्ली – कोरोनामुळे जगभरातील सर्वच क्रीडाप्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यातच आता पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण या दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक हा उशिराने जाणार असल्याचे समोर आले आहे. कारण तो गेल्या पाच महिन्यांपासून आपली पत्नी सानियाला न भेटू शकल्यामुळे तो सानियाला भेटल्यानंतरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने निश्चित केले आहे. पण पाकिस्तानचा संघ जेव्हा इंग्लंडमध्ये जाणार, तेव्हा माजी कर्णधार शोएब मलिक हा त्यावेळी पोहोचणार नाही. कारण या दौऱ्यावर पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला भेटल्यानंतरच तो जाणार असल्याचे समजते आहे.

सानिया आणि तिचा मुलगा हे दोघेही सध्याच्या घडीला भारतामध्येच आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवा कोरोनाच्या या काळात बंद ठेवण्यात आल्यामुळे शोएबने गेल्या पाच महिन्यांमध्ये सानिया आणि आपल्या मुलाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी आधी पत्नी आणि मुलाची भेट घेतल्यानंतरच रवाना होणार आहे.

२८ जूनला पाकिस्तानचा २९ खेळाडूंचा संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण या संघाबरोबर शोएब मात्र इंग्लंडला जाणार नाही. शोएब या दौऱ्याच्या पूर्वी पत्नी सानियाला भेटणार आहे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याला परवानगीही दिल्यामुळे आता शोएब २४ जुलैला पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडमध्ये भेटणार आहे.

याबाबत माहिती देताना पाक क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबियांपासून शोएब पाच महिने दूर असल्यामुळे आपल्या कुटुंबियांना भेटण्याची त्याला इच्छा आहे. आम्ही त्याची ही विनंती मान्य केली आहे. सध्याच्या घडीला बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यामुळे शोएबला आम्ही कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली आहे. शोएब कुटुंबियांना भेटल्यावर थेट इंग्लंडला रवाना होणार आहे.

Leave a Comment