कोरोनावरून चीनला ट्रम्प यांनी ‘कुंग फ्लू’ म्हणत पुन्हा डिवचले


वॉशिंग्टन – जगभरात झपाट्याने प्रादुर्भाव होत असलेल्या कोरोनावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर सातत्याने आरोप करत आहेत. ट्रम्प यांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्येही कोरोनाच्या प्रसाराचा चीनवर ठपका ठेवला. ट्रम्प यांनी यावेळी चीनवर कोरोना व्हायरसचा उल्लेख कुंग फ्लू असा करत हल्लाबोल केला.

कोरोनाचा व्हायरस चीनच्या वुहान शहरात आढळून आल्यानंतर हा व्हायरस हळूहळू चीननंतर जगभरात पसरला. या व्हायरसमुळे जगभरातील ४ लाक ५० हजार लोक मरण पावले आहेत. तर ८५ लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे. त्यातच कोरोनामुळे अमेरिकेत प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडाही मोठा असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह ट्रम्प प्रशासन कोरोनासाठी चीनवर आरोप करत आहे.

शनिवारी ओक्लाहोमामधील तुल्सा येथे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारसभा झाली. ट्रम्प यांनी यावेळी कोरोनासाठी चीन जबाबदार असल्याचा पुर्नरूच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प कोरोनाविषयी बोलताना म्हणाले, याला मी कुंग फ्लू म्हणू शकतो. मी त्याचा उल्लेख १९ वेगवेगळ्या नावांनी करू शकतो. त्याला अनेकजण व्हायरस म्हणतात. जो की तो आहेच. तर अनेक जण त्याला फ्लू म्हणतात. काय फरक आहे. मला वाटत आपल्याकडे कोरोनाची १९ ते २० नावे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी चीनला डिवचण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment