राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींचा ‘सरेंडर मोदी’ असा उल्लेख


नवी दिल्ली : देशातील राजकीय वातावरण पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारत आणि चीन लष्करात झालेल्या चकमकीनंतर पूर्णपणे ढवळून निघाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांचे नावच राहुल गांधी यांनी बदलून हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका ट्विटरवर केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये ट्विट वॉर सुरू झाले आहे.


दरम्यान शनिवारीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमणापुढे भारतीय भूमी सरेंडर केली आहे का? अशी टीका ट्विटरवर त्यांनी केली होती. त्याचबरोबर काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, ती जमीन जर चीनची होती तर, भारतीय जवान शहीद का झाले? आणि ते कोठे शहीद झाले?


दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी ज्या अपमानास्पद शब्दांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी करत आहेत, तसा वापर शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत. पंतप्रधान आणि देशाचा राहुल गांधी सातत्याने अपमान करत आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सरेंडरच्या स्पेलिंगमध्ये चूक केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आता त्यांना त्यावरुन ट्रोल केले जात आहे.

Leave a Comment