कोरोनावर प्रभावी लस या वर्षाच्या अखेरपर्यंत येऊ शकते


लंडन : कोरोना व्हायरसवर उपचारासाठी प्रभावी लस तयार करण्यासाठी सुरु असणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांच्या दृष्टीने जिनेवा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेतील (डब्ल्यूएचओ) मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसवर प्रभावी लस यावर्षा अखेरीस उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत प्रभावी समजले जाणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मृत्यूपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी भविष्यात प्रभावी लस तयार करण्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, सुमारे दहा उमेदवार मानवी चाचणी टप्प्यात असून त्यापैकी तीन उमेदवार नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्यामुळे ही लस प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. स्वामीनाथन प्रभावी औषधाबाबत डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांचा उल्लेख करत पुढे म्हणाले की, मी आशा करते. मी आशावादी आहे. पण एक अत्यंत किचकट प्रक्रिया लस विकसित करण्यासाठी असते आणि यामध्ये अत्यंत अनिश्चितताही असते. चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडे अनेक वेगवेगळे उमेदवार आहेत, तसेच अनेक प्लॅटफॉर्मही आहेत.

त्या पुढे म्हणाले की, आपण जर भाग्यवान असू तर, एक किंवा दोन प्रभावी उमेदवार यावर्षा अखेरपर्यंत असतील. त्याचबरोबर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे असेही म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी मलेरियावर प्रभावी ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची भूमिका असू शकते. यावर सध्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. तसेच अद्याप कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नेमकी कोणती आणि काय भूमिका बजावते हे स्पष्ट झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या इतर परिक्षणांसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत हे आम्हाला माहिती नसल्यामुळे मोठ्या स्तरावर परिक्षण पूर्ण करणे आणि आकडे मिळवण्याची गरज आहे.

Leave a Comment