गोकूळधामच्या एकमेव सेक्रेटरीने ‘तारक मेहता..’साठी सोडली होती दुबईतील नोकरी


सब टिव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यातीलच एक पात्र म्हणेज गोकूळधामचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर. आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेतून गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मंदार हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी अभिनयात करिअर करण्यासाठी दुबईतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम केला होता.

मंदार यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. मी २००८ पर्यंत खूप संघर्ष केला. दुबईत मेकॅनिकल इंजीनिअर म्हणून काम करत होतो. तेथील नोकरी सोडून मी भारतात परतलो. कारण मला अभिनयात करिअर करायचे होते. मला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती. बऱ्याच नाटकांमध्ये मी काम केले पण मनासारखी भूमिका मला मिळाली नाही. अखेर मला २००८ मध्ये ‘तारक मेहता’ची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

माझे संपूर्ण आयुष्यच ‘तारक मेहता..’ मालिकेत काम केल्यापासून बदलले. ज्या मालिकेत मी काम करत आहे, ती एवढी लोकप्रिय होईल याचा विचारसुद्धा केला नव्हता. लोक सहसा मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याचे स्वप्न पाहतात. पण मोठमोठे सेलिब्रिटीच ‘तारक मेहता..’च्या मालिकेत आले. जेव्हा आमच्या मालिकेत अमिताभ बच्चन आले तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता. बिग बींसोबतच शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार हेसुद्धा सेटवर आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment