सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देत, म्हटले…


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडसोबतच त्याच्या चाहत्यांना अद्यापही सुशांत आपल्यातच असल्याचे वाटत आहे. त्यातच आता सुशांतने नेमकी कशामुळे आत्महत्या केली, या कारणांचा मुंबई पोलीस तपास घेत आहेत. दरम्यान ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी सुशांतने त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना पगार दिले होते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पगार देताना त्याने त्याला यापुढे पैसे देणे शक्य होणार नसल्याचे म्हटले होते.

पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांचा जबाब नोंदवला आहे. सुशांत एका वेब सीरिजमधील भूमिकेसंदर्भात दिशा सालियनसोबत चर्चा करत होता, अशी माहिती त्याच्या एका मॅनेजरने पोलिसांना दिली. दिशा सालियन ही आधी सुशांतकडेच मॅनेजर म्हणून काम करायची. तिनेसुद्धा सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. पण अद्याप ठोस काही माहिती या दोघांच्या चर्चेबाबत मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अद्याप सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यायचा आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी जोरदार मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. त्याने ‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काइ पो चे’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

Leave a Comment