उत्तर प्रेदशातील मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये कार्यरत असलेले 88 कर्मचारी ‘कोरोना’बाधित


लखनऊ – उत्तर प्रेदशात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सहाय्यतेसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीच्या 88 कर्मचारी कोरोनाबाधित निघाले आहेत. या 88 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हेल्पलाईन सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रेदशातील मुख्यमंत्री हेल्पलाईनचे कंत्राट सुरेविन बीओपी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून कोरोना संसर्गाबाबत कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीवर लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

कंपनीला बजावलेल्या नोटीसीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने तीन मोठ्या गोष्टींची विचारणा केली आहे. सर्वप्रथम, कार्यालयात, सामाजिक अंतर, स्वच्छता आणि मास्कचा वापर केला होता. जर ते केले नाही तर मग हा निष्काळजीपणा का केला ? दुसरे, मोठ्या संख्येने एकाच वेळी कर्मचाऱ्यांना कार्यालयात का बोलावून घेतले ? आणि तिसरा प्रश्न विचारला तो म्हणजे, कंपनीने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही ? असे तीन प्रश्न कंपनीला नोटीसीद्वारे विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, वाढत्या कोरोना प्रकरणांमध्येही उत्तर प्रदेशला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजे याठिकाणी जास्तीत जास्त रुग्ण बरे होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

याबाबत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात सध्या कोरोनाचे 5064 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत 8610 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Leave a Comment