पुणेकरांच्या बेशिस्तपणामुळे शहरातील सर्व उद्याने बंद होणार!


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता आली होती. त्याचनुसार पुणे महापालिकेने देखील शहराच्या विविध भागातील 31 उद्याने सुरु करण्यास परवानगी दिली होती. पण शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुणेकरांचा बेशिस्तपणा यामुळे अखेर ही उद्याने बंद करण्याची मागणी होत आहे. याबाबत शहरातील सर्व उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी स्वतः पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच आयुक्तांना पत्र लिहून केल्यामुळे पुण्यातील सुरु असलेली सर्व 31 उद्याने पुन्हा बंद होण्याची शक्‍यता आहे.

एकीकडे शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूही होत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत उद्याने उघडून काय साधायचे आहे? असा सवाल महापौर मोहोळ यांनी केला आहे. महानगरपालिका प्रशासन आज मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

नागरिकांना काही बंधने घालून अनलॉक 1 नावाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात उद्याने आणि मैदाने खुली करण्यात आली. पण योग्य ती काळजी नागरिकांकडून घेतली जात नसल्याचे दिसून आले. उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमावे लागले. आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको, अशी भूमिका घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना तसे पत्रही देऊन आदेश काढण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यान खात्यातील अधिकाऱ्यांसह चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत पुण्यातील कंटेनमेंट झोनमधील 15 परिसरात नवे रुग्ण आढळले नाहीत आणि जुने रुग्ण बरे झाले असल्यामुळे हे 15 परिसर आता कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात येणार आहेत. रुग्ण सापडून त्यांची संख्या वाढलेल्या 5 ते 6 परिसरांचा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश होणार आहे. आज याबाबतचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन आणि त्याबाहेरील हद्दीत आता सुरु असलेली दुकानेच सुरु राहणार आहेत. नव्याने काही व्यवहार सुरु करण्याच्या हालचाली तुर्तास तरी नाहीत, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शहरातील गेल्या 15 दिवसांमधील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यात विशेषतः कंटेन्मेंट झोन कमी करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. रुग्ण संख्या पाहून कंटेन्मेंट झोन कमी-अधिक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या 66 पैकी 15 कंटेन्मेंट झोन कमी करून त्याठिकाणचे किमान व्यवहार सुरु करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. तर, याच काळात काही परिसरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा 5 परिसरात नव्याने बंधने लादली जाणार आहेत.

Leave a Comment