
मुंबई – महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला मान्सून आता सक्रिय झाला असून दरम्यान मुंबईमध्ये आज (15 जून) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता मुंबईतील अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे शहर परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात. त्यानुसार पवई, विलेपार्ले, अंधेरीसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात
दरम्यान कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाल्यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस जोर धरु शकतो. अशामध्ये मुंबईकरांनाही पावसाचा आनंद लुटता येणार आहे. पण सध्या मुंबईत कोरोनाने थैमान घातलेले असल्यामुळे विनाकारण पावसात भिजणे नागरिकांनी टाळावे, असा सल्ला देखील राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने सध्या जोर धरला आहे. तर मध्य मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ढग दाटून आले आहे. दरम्यान यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीच्या 100% पाऊस बरसणार आहे. 11 जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर आता त्याची कोकणात धुव्वाधार बॅटिंग सुरू झाली आहे.
